लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सात उमेदवार निवडून आले असले तरी या उमेदवारांच्या विजयात भाजपचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागला आहे. पण त्याच वेळी भाजप उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाची मते तेवढी भाजपकडे हस्तांतरित झालेली नाहीत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीत भाजपचे पारंपारिक मते मित्र पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरित झाली. पण महायुतीत भाजप उमेदवारांना शिंदे वा अजित पवार गटाची तेवढी मते हस्तांतरित झाली नाहीत, असे भाजपच्या वरिष्ठांचे निरीक्षण आहे.

महाविकास आघाडीतही काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात याउलट योग्य समन्वय होता. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने १३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या इचलकरंजीमध्ये ४५ हजारांचे मताधिक्य मिळाले. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या विजयात संजय कुटे आणि आकाश फुंडकर या भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये चांगली आघाडी मिळाली. मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विजयात भाजपचे आमदार असलेल्या पनवेल आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांतून चांगली आघाडी मिळाली. संभीजीनगरमध्ये भाजपने जोर लावल्यानेच संदिपान भूमरे यांचा विजय झाला. कारण संभाजीनरमध्ये शिंदे गटाची यंत्रणा विस्तळीत होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोदी यांच्यसाठी सारी ताकद पणाला लावली असे सांगण्यात येते.

हेही वाचा >>>आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालकांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण

वायव्य मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर हे अवध्या ४८ मतांनी विजयी झाले. वायकर हे गेली अनेक वर्षे आमदार असलेल्या जोगेश्वरी मतदारसंघातून मोठ्या फरकाने मागे पडले. पण आमदार अमित साटम आणि मुरजी पटेल या भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांनी मोठे मताधिक्य अंधेरीत मिळवून दिल्याने वायकर यांचा विजय झाला. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असले तरी डोंबिवलीत रविंद्र चव्हाण, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ताकद दिल्यानेच विजय अधिक सुकर झाल्याचे बोलले जाते. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी होती. कारण शिंदे गट कमकुवत झाला असता तर उद्धव ठाकरे यांची ताकद अधिक वाढली असती. हे होऊ नये म्हणूनच आम्ही सारी ताकद लावल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.