मुंबई : बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात घुसून सन २०२० मध्ये आंदोलन केल्याप्रकरणी मुंबदेवीतील भाजपचे नगरसेवक आकाश राज पुरोहित यांना सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांचा जामीन अर्जही फेटाळून लावला आहे. सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने हे आदेश दिले.
करोना व टाळेबंदीच्या काळात अनेकांना नोकरी, व्यवसायापासून मुकावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय गेले असे असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवल्याविरोधात भाजपने तेव्हा आंदोलन केले होते. बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात घुसून त्यांना घेरण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह माजी आमदार अतुल शहा, भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित, नगरसेविका शीतल गंभीर व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी सुरू असताना काही आरोपी नेते न्यायालयात उशिरा पोहोचल्याने न्यायाधीशांनी राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना वगळून इतर आरोपींविरोधात वॉरंट जारी केले. त्यानंतर उर्वरित नेते न्यायालयात हजर झाल्याने त्यांना दंड आकारून सोडून देण्यात आले.
मात्र, आकाश राज पुरोहित हे हजर झालेच नसल्यामुळे त्यांच्याविरोधात यापूर्वीही वॉरंट जारी झाले असल्याने न्यायालयाने त्यांना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना ११ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
