मुक्ताईनगरमधील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत

नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा भाजपबरोबरच एकनाथ खडसे यांच्यासाठीही धक्का मानला जात आहे.

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी बुधवारी वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे आणखी चार नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मुक्ताईनगर हा पूर्वी भाजपमध्ये असलेले व आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला. त्यामुळे या  नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा भाजपबरोबरच एकनाथ खडसे यांच्यासाठीही धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगरमधील भाजपचे नगरसेवक एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीत जातील असेच सर्वांना वाटत होते. पण त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला त्याचा आनंद आहे. यानिमित्ताने भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीत आले याचा एकनाथ खडसे यांनाही आनंदच होईल, अशी आशाही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp corporator from muktainagar in shiv sena akp