मुंबई : मुंबई महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी असलेले भाग ओळखून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी कर लागू करावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केल्यानंतर आता त्यावरून राजकारण तापले आहे. या मागणीला आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. मुंबई लुटणाऱ्या ह्या प्रस्तावाशी भाजपा सहमत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मुंबईत वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे कित्येक तास प्रवासात जातात. त्यातही काही विशिष्ट परिसरात ही वाहतूक कोंडी अधिक असते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने मुंबईतील गर्दीच्या व्यावसायिक विभागांमध्ये वाहतूक कोंडी कर लागू करावा आणि गर्दीच्या भागात प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारावे अशी मागणी नवनिर्वाचित भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात हा कर लागू करावा असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे. उच्च वाहतूक असलेल्या भागांमध्ये एकट्या प्रवाशासह येणाऱ्या खासगी वाहनांवर हा कर लावावा व येत्या अर्थसंकल्पात तो लागू करावा अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.

नार्वेकर यांच्या या मागणीवरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून अद्याप कामकाजाला सुरूवातही झालेली नाही. त्यातच असा एखादा कर लावणे हे भाजपला परवडणारे नाही. मात्र नार्वेकर यांनी अशी मागणी केल्यामुळे एका अर्थाने भाजपच अडचणीत आल्यासारखी स्थिती आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत समाज माध्यमांवरून काही प्रश्न उपस्थित केले असून असा कर लावण्यास भाजपची सहमती आहे का असा प्रश्न उपस्थित करून भाजपला कोड्यात टाकले आहे.

काय म्हटले आहे आदित्य ठाकरे यांनी

मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे बंधू मकरंद नार्वेकर (कुलाबा येथील भाजप नगरसेवक) ह्यांनी मुंबईतील वाहनांवर वाहतूक कोंडी कर लावण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेला लिहिले आहे. मुंबईचे काहीही भले न करता, मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचे हीच भाजपची वृत्ती आहे. मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असूनही, भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काहीच ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. उद्योग आणि रोजगार मात्र सातत्याने मुंबईतून बाहेर नेण्यात आले, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

गेल्या ४ वर्षांत भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि यांसारखे अनेक घोटाळे खुलेआम केले गेले. तरीही, हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याच कष्टकरी मुंबईकरांकडून अजून पैसे उकळण्याची मागणी करण्याचे धाडस करतो? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजपा मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते? भाजपच्या कंत्राटदारांनी मुंबईतल्या रस्त्यांची दुरावस्था करुन जे आपले घामाचे पैसे उधळले आहेत, त्यासाठी मुंबईकरांना भाजपा कर परतावा करणार का? भाजपने खासगी बस कंपन्यांना फायदा होण्यासाठी बेस्ट बसेस मधे जी कपात केली, त्यासाठी भाजपा कर परतावा करणार का? हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे भाजपा कर परतावा करणार का?, असेही सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.