मुंबई : नालेसफाईला नुकतीच सुरुवात झालेली असून भाजपने गुरुवारी नालेसफाई पाहणी दौऱ्यांचे आयोजन केले होते. गुरुवारी पहिल्या दिवशी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी भाजपने केली. यावेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी भाजपच्या नेत्यांनी साधली. अद्याप नाल्यात गाळाचे ढिगारे कायम असून सत्ताधारी फरार असे चित्र पाहायला मिळत आहे, अशी टीका भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी यावेळी केली आहे.
दरवर्षी पावसाळय़ात पाणी तुंबले की नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेवर विरोधक टीका करण्याची संधी साधतात. नालेसफाई करण्यासाठीचे प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर न केल्यामुळे याबाबतची कामे रखडली होती. मात्र, प्रशासनाने नुकतीच या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दरवर्षीप्रमाणे यावेळीही नालेसफाईची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले आहे. भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ६ ते १४ एप्रिल या कालावधीत नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जाणार आहे. पहिल्या दिवशी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी करण्यात आली.
भाजपने रेटा वाढवला म्हणून अखेर नालेसफाईच्या कामांना एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होते आहे, असा दावा आमदार आशीष शेलार यांनी यावेळी केला. या दौऱ्याला माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट, अभिजीत सामंत, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, पंकज यादव, उज्ज्वला मोडक आणि एच पश्चिम महापालिका वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदी सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी खार गझदर बांध साऊथ एव्हेन्यू नाल्यापासून दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नॉर्थ एव्हेन्यू, एस. एन. डी. टी. नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाल्याची पाहणी करण्यात आली. एस.एन.डी.टी. नाला सोडला तर अद्याप कुठेही कामाला सुरुवात झालेली नाही. सर्वच ठिकाणी नाल्यात गाळाचे ढीग पडून असून अवघ्या दीड महिन्यांत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे या कामांना गती द्या, अशी सूचना आमदार शेलार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
प्रशासनाने नालेसफाईच्या कामांचे १३० कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आणले, पण त्याला मंजुरी न देताच पालिकेची मुदत संपली आणि सत्ताधारी फरार झाले. त्यानंतर भाजपने आवाज उठवल्यावर हा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी मंजूर केला. वास्तविक मार्चमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळून महिनाअखेरीस कामांना सुरुवात होणे अपेक्षित होते. यावेळी सत्ताधाऱ्यांमुळे या कामांना विलंब झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कामांसाठी अतिरिक्त ३० कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे ही नालेसफाई आहे की हातसफाई, असा सवालही आशीष शेलार यांनी केला आहे. या कामांवर लक्ष ठेवण्यापासून सत्ताधारी पळ काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.