मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चिात झाले आहे.

मुंबई महानगरपालिके तून विधान परिषदेवर दोन आमदार निवडून दिले जातात. यासाठी होणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेसाठी भाजपककडून पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी चित्रा वाघ यांचे नाव आघाडीवर आहे.  भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होऊन प्रदेश सुकाणू समितीकडून उमेदवाराची शिफारस केंद्रीय समितीकडे पुढील आठवड्यात केली जाईल.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व विशेषत :  महिलांच्या प्रशद्ब्रावर आघाडी उघडणाऱ्या चित्रा वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.  माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील प्रकरण वाघ यांनीच लावून धरले होते. शेवटी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात महिलांच्या विरोधात कोठेही अत्याचार झाल्यास वाघ या लगेचच धावून जातात. राज्यातील बड्या नेत्यांना डावलून वाघ यांना नुकतेच राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.