भाजपाच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षात सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेतीलबंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपाचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल असा विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार मानले. “अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असंही ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray Resign: उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहितीच नव्हती?

“येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पुढील सूचना येईपर्यंत भाजपाच्या सर्व आमदारांनी मुंबईतच थांबावं असा आदेश दिला.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपाच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.

Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठले.

‘‘माझा एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणे ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचे पुण्य या बंडखोरांना मिळू दे. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती. मी तुम्हाला सांगून मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षां’ निवासस्थान सोडले होते. आज सर्वासमोर मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद आमदारकीचाही त्याग करत आहे’’, असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जाहीर केले. ‘‘मी घाबरणारा नाही, पण कारण नसताना शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, ही इच्छा आहे. आता पुन्हा शिवसेना उभी करण्यासाठी शिवसेना भवनात बसणार असून तुमची साथ हवी आहे,’’ अशी भावनिक साद ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली.

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. गेल्याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारने निम्मा म्हणजे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचेच आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.