मुंबई : सार्वजनिक रस्त्यावर फटाके न फोडण्याच्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या जनजागृती संदर्भातील चित्रफितीवर सत्ताधारी भाजपने आक्षेप घेत जोरदार टीका केली. मात्र, भाजपच्या या भूमिकेचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असल्याने भाजपने अभिनेत्री दिया मिर्झाची माफी मागावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यासाठी पालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. त्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यातील बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या ध्वनीचित्रफितीवरून वाद उफाळून आला.
आमदार अमित साटम यांनी त्यावर आक्षेप घेत दिया मिर्झा हिने दिवाळी कशी साजरी करायची, हे शिकवू नये, असे आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून सोमवारी राजकीय वातावरण तापले. उच्च न्यायालयाने याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, विरोधकांकडूनही याप्रकरणी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही तीव्र आक्षेप नोंदवला.
विशिष्ट धर्मीयांना भाजपकडून जाणीवपूर्वक लक्ष्य
प्रदूषणासंदर्भात जनजागृतीच्या संदेशाला भाजपने धार्मिक रंग दिला. दिया मिर्झा ही हिंदू विरोधी असल्याचे खोटे कथानक पसरवले. तसेच मुंबई महापालिकेवर दबाव आणून दिया मिर्झाची चित्रफित काढून टाकण्यास भाग पाडले. भाजपचे हे राजकारण धार्मिक द्वेष पसरवणारे असून विशिष्ट धर्मीयांना भाजपकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, हे पुन्हा अधोरेखित झाल्याचे आमदार रईस शेख म्हणाले.
चित्रफित का हटवली, याचा जाहीर खुलासा करा
पर्यावरणपूरक दिवाळी संदर्भात जनजागृतीचा संदेश देणाऱ्या दिया मिर्झाच्या विरोधात द्वेष निर्माण करणारी विधाने करणारे अमित साटम यांनी तिची माफी मागावी. तसेच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिया मिर्झाची चित्रफित का हटवली, याचा जाहीर खुलासा करावा. दिया मिर्झाची चित्रफित मुंबई महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.
