मुंबई : देशात केवळ आपणच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून असावे दुसरा हिंदुत्ववादी पक्ष नको, अशी भाजपची भूमिका असून त्यातून शिवसेना संपवण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. आपल्याच लोकांनी त्यांना साथ देत आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आधारे विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यावर भाजपने आपल्याशी युती केली आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली. शिवसेना हा एक विचार असून तो विचार संपवणे हेच भाजपचे धोरण आहे हे समजून घ्या. शेरास सव्वाशेर हा भेटतोच. कदाचित त्यामुळेच भाजपला उत्तर देण्याची जबाबदारी भवानीमातेने शिवसेनेवर टाकली आहे, असे ठाकरे म्हणाले. गेलेले काही आमदार अजूनही माझ्या संपर्कात आहेत. वर्षां सोडले म्हणजे मोह सोडला पण जिद्द सोडलेली नाही. शिवसैनिकांच्या भरवशावर मी लढणार आहे. कोणी काही करो, शिवसेना पुन्हा विजयी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.