मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देवून धक्कातंत्र राबविणाऱ्या भाजप पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिमंडळ विस्तारातही तोच प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. मात्र ते करताना फडणवीस यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्य मंत्री व उप मुख्य मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि पुढील दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारवरील विश्वासदर्शक ठराव संमत होईल.

त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून पाच किंवा सहा जूनला तो होण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठराव झाल्यावर शिंदे व फडणवीस नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान द्यायचे, भाजप व शिंदे गटाला किती मंत्रीपदे व महत्वाच्या खात्यांचे वाटप कसे करायचे, याबाबत चर्चा होईल. फडणवीस यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला पाच कँबिनेट आणि सात राज्यमंत्रीपदे देण्यात आली होती.

फारशी महत्वाची खाती दिली गेली नव्हती. आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक मंत्रीपदे व काही महत्वाची खाती शिंदे गटाला दिली जातील, मात्र मंत्रिमंडळावर भाजपचा वरचष्मा राहाल. पुढील दोन-अडीच वर्षांत सरकारला चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान असल्याने भाजपच्या अनुभवी मंत्र्यांचाही समावेश मंत्रिमंडळात केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.