मुंबई: नितीशकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले असते, तर विरोधकांनी त्यांच्या आजारपणावरुन अपप्रचार केला असता, हा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही रालोआच्या (एनडीए) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही, असे प्रतिपादन भाजपचे केंद्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना केले. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची निवड एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ नितीशकुमार की अन्य कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
बिहारमध्ये एनडीएच्या घवघवीत यशामध्ये महाराष्ट्रातील तावडे यांचाही मोठा वाटा आहे. बिहारमधील प्रचंड यशामागे कोणती रणनीती होती व त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात आली, याविषयी तावडे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपने तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपविली होती.
तावडे यांनी अडीच वर्षे बिहारमध्ये तळ ठोकला. नितीशकुमार यांना पुन्हा एनडीए बरोबर आणणे, लोकसभा निवडणुकीत ४० पैकी ३० जागा मिळविणे आणि विधानसभा निवडणुकीआधी जनहिताच्या मोठ्या योजना अंमलात आणण्यात तावडे यांचाही सहभाग आहे. एनडीएच्या जागावाटपाच्या बैठकीत कोणत्या समाजाचा उमेदवार दिल्यास तो निवडून होईल, हे निश्चित करुन आणि विजयी होणारा उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे, हे पाहून एनडीएचे जागावाटप करण्यात आले होते.
प्रशांत किशोर यांना उत्तरच दिले नाही
बिहार निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून प्रशांत किशोर मोठे आव्हान उभे करतील, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. पण प्रशांत किशोर यांचा करिष्मा चालणार नाही. ते केवळ समाजमाध्यमांवर प्रभावी आहेत, ते जनतेपर्यंत पोचू शकणार नाहीत, अशी खात्री एनडीएला होती. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या टीकेला उत्तर न देण्याची रणनीती एनडीएने आखली होती.
जातीय राजकारणातून बिहार बाहेर पडला
एनडीएला मिळालेल्या जागांपैकी ३० मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, ६० मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातींच्या समाजाची लोकसंख्या मोठी आहे, तर ११० जागा अतिमागास किंवा अविकसित क्षेत्रातील आहेत. याचा अर्थ बिहारच्या जनतेने जातीपातीच्या राजकारणाबाहेर जावून एनडीएला मतदान केले आहे. त्याचे श्रेय भाजपने केलेल्या जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडून विकासासाठी केलेल्या प्रचाराला आहे. भाजपने ‘ रफ्तार पकड चुका है बिहार ‘ ही टॅगलाईन घेतली होती. त्यामुळे निवडणुकीतील चर्चा जातीवरुन विकासाच्या मुद्द्यावर गेली आणि बिहार जातीय राजकारणातून बाहेर पडून विकासाच्या मार्गावर गेला आहे, असे तावडे यांनी सांगितले.
