मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री घेण्यात आला. भाजप व घटकपक्षांचा विस्तारासाठी मोठा दबाव असून हिवाळी अधिवेशानाच्या पूर्वीच हा विस्तार व्हावा, असा भाजपमधील इच्छुकांचा आणि घटक पक्षांचाही आग्रह आहे. त्यामुळे अखेर या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला असे सूत्रांनी सांगितले. या विस्ताराला २७ किंवा ३० नोव्हेंबरचा मुहूर्त साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिवाळी अधिवेशानापूर्वी या विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र विस्तार लांबतच चालल्याने भाजपमधील इच्छुकांचा असंतोष वाढत होता. घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्यांना विधान परिषदेवर निवडून आणण्याची जबाबदारी भाजपला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुर्तास स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजप मधील कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करायाचा याबाबत रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.
मित्र पक्षांचा दबाव
दरम्यान, निवडणुकीपूर्वी सत्तेत सहभागी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. वर्ष उलटले तरी त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. दिलेला शब्द पाळा आणि घटक पक्षांना मंत्रिमंडळात सामावून घ्या, अशी मागणी मित्र पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी केली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे हे मित्र पक्षांचे नेते चर्चेत सहभागी झाले होते.
शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदे दिली जाणार आहेत. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये पांडुरंग फुंडकर, शोभाताई फडणवीस आदी ज्येष्ठ नेत्यांनाही मंत्रिपद हवे आहे. जयकुमार रावळ, संजय कुटे, चैनसुख संचेती, आशीष शेलार यांचाही मंत्रिपदावर डोळा आहे. बाहेरच्या पक्षातून निवडून आलेल्यांचा विचार व्हावा, अशी मागणी या आमदारांकडून केली जात आहे. भाजपमध्ये शक्यतो बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना संधी दिली जात नाही, पण केंद्रात हा अपवाद करण्यात आला असल्याने राज्यातही अपवाद करावा, अशी मागणी आहे.

पत्नीला मंत्रिपद नाही -आठवले
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा यांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाणार अशी चर्चा सुरू झाल्याने पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. पक्षातील एकूणच प्रतिक्रिया बघूनच बहुधा पत्नीला मंत्रिपद दिले जाणार नाही, असे आठवले जाहीर केले.