देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत देखील मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बैलगाडी वर नेतेमंडळींचं ओझं वाढल्याने गाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासहीत सर्व नेते आणि कार्यकर्ते खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होता. त्यानंतर आता इंधन दरवाढावीविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत जाण्याचे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा मलबार हिलच्या उतारावरून सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झाले असा टोला भाजपाने लगावला आहे.

इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत जाणार आहेत. त्यानंतर ते राज्यपाल भगतसिंग कोश्यायर यांची भेट घेतील आणि इंधनातील दरवाढ कमी करण्याचे आवाहन करतील असे सांगण्यात येत आहे.

भाई जगताप यांनी देखील काही दिवसांपूर्वी अश्याच प्रकारचे आंदोलन केले होते. इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी भाई जगताप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बैलगाडीवरुन आंदोलन करत होते. गाडीवर वजन जास्त झाल्याने ती बैलगाडी मोडली होती. या बैलगाडीवर दाटीवाटीनं काँग्रेस कार्यकर्ते उभे होते. सगळ्यात पुढे भाई जगताप उभे होते. मात्र, अचानक गाडी मोडली आणि वर उभे असलेले सर्वजण सरळ खाली कोसळले.

नाना पटोलेंच्या या आंदोलनाबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टोला लगावला आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी मलबार हिल हँगींग गार्डन येथून ११ वाजता काँग्रेस नेते सायकलने राजभवनावर जाणार आहेत. बैलगाडीवरून कोसळले आता काँग्रेस जशी घरंगळत जाते आहे तसे मलबार हिलच्या उतारावरून सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झाले,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान याआधी मुंबईत घडलेल्या घटनेमध्ये भाई जगताप यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खाली पडले. त्यावर व्हिडिओ शेअर करत टोला लगावणारं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं होत. “गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! मा. भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंच करावं. असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जिवांचा विचार करावा!” असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं होतं.