“असा कुणी गावगुंड खरंच असेल तर नाना पटोलेंनी…”, मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाचा हल्लाबोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय. पटोले जे बोलले ती काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला. तसेच या घटनेला कित्येक तास उलटूनही काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं नसल्याचं उपाध्ये म्हणाले. ते आज (१८ जानेवारी) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

केशव उपाध्ये म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जी गलिच्छ, विकृती स्वरुपाची भाषा वापरली त्याबद्दल सरकार काय कारवाई करणार हा आमचा प्रश्न आहे. या घटनेला कित्येक तास उलटून गेले तरीही अद्याप काँग्रेस, राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. मारहाण करावी, हिंसाचार करावा ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का? याचा खुलासा काँग्रेसने करावा.”

हेही वाचा : “मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

“असा कुणी गावगुंड खरंच असेल तर फोटोसह माहिती जाहीर करा”

“मराठीत एक म्हण आहे, ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ या म्हणीचा प्रत्यय नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणातून येतो. ती क्लिप नीट ऐकली तर पटोले मारहाणीची भाषा करतात. त्यावर त्यांनी स्थानिक गावगुंडाबद्दल बोलत होतो असं म्हटलं. यालाच वरशिरजोरीपणा करणं म्हणतात. कारण असा कुणी गावगुंड खरंच असेल तर त्याची माहिती फोटोसह पटोलेंनी जाहीर केली पाहिजे. त्याच्यावर किती खटले, किती कारवाया झाल्या हे सांगितलं पाहिजे. तसेच काँग्रेस सत्तेत असून अशा गावगुंडांवर कारवाई का करत नाही? ठाकरे सरकारवर त्यांचा विश्वास नाही का?” असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी विचारला.

“पटोले यांना मारहाणीची, हिंसाचाराची भाषा करण्याची वेळ का येते?”

केशव उपाध्ये पुढे म्हणाले, “नाना पटोले यांना मारहाणीची, हिंसाचाराची भाषा करण्याची वेळ का येते? राज्यातील पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही का? की सरकारमध्ये त्यांना कुणी विचारत नाही? त्यांचा खुलासा हा हास्यास्पद आहे. त्या गावगुंडाची सगळी माहिती समोर आली पाहिजे. चोर तो चोर वर शिरजोर या स्वरुपाचं प्रत्यंतर नाना पटोले यांनी दिलंय. मागील ४ तास राज्य सरकारचा दुटप्पीपणा समोर आलाय. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीयेत.”

“नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर ज्या भाषेत टीका केली ती सहन करता येणार नाही. त्यांच्यावर तक्रार दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे,” अशीही मागणी उपाध्ये यांनी केली.

राज्यात भाजपाकडून ठिकठिकाणी आंदोलन

दरम्यान, नाना पटोले यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. तसेच पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

“काँग्रेस हा वैफल्यग्रस्त नेत्यांचा पक्ष”

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले विधान बघता काँग्रेस पूर्णपणे विचलित झाली आहे. काँग्रेसच्या नेत्याना लोकशाही मार्गाने नरेंद्र मोदी यांचा पराभव करता येत नाही त्यामुळे दिवसा स्वप्न पडू लागले आहे. काँग्रेस हा वैफल्यग्रस्त नेत्यांचा पक्ष झालेला आहे,” अशी टीका राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा : “नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर

“नाना पटोले यांची यापूर्वी अशी वादग्रस्त विधाने समोर आली असताना ते बोलतात ते त्यांनाही लक्षात येत नाही. पंतप्रधानाच्या विरोधात काँग्रेसने कट रचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. सत्तेपासून दूर असल्यामुळे जलबिन मछली अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. मोदीच्या मागे देशाची जनता आहे. काँग्रेसने सत्तेसाठी कितीही प्रयत्न करत मोदींना संपविण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. त्यांचे हसीने सपने राहणार आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp keshav upadhye demand to nana patole to disclose information of criminal modi pbs

Next Story
राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सचं झालं बारसं; आता ‘या’ नावांनी ओळखले जाणार नवे पाहुणे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी