scorecardresearch

Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!

“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान…!”

Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!
भाजपा आणि काँग्रेसमध्ये 'व्हिडीओ वॉर'!

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल विरोधकांसाठी टीकेच्या केंद्रस्थानी असतानाच आता पुन्हा एकदा विरोधकांनी राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. आज २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी अभिवादन केलं. यावेळचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला असून राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. त्यावरून भाजपानंही उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमका काय आहे वाद?

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्यपालांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. “अभिवादन करताना पादत्राने बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृची आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती, तर बरे झाले असते”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी राज्यपाल पायात चपला घालून अभिवादन करण्यासाठी जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काँग्रेस-भाजपामध्ये ‘व्हिडीओ वॉर’!

एकीकडे काँग्रेसनं हा व्हिडीओ ट्वीट केला असताना भाजपानंही गेल्या वर्षीचा २६/११ चा व्हिडीओ ट्वीट केला आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनीही पायात जोडे घालूनच हुतात्म्यांना अभिवादन केल्याचा दावा केला आहे.

“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान पोलीस प्रसासनाशी बोलून घेतले असते. २६/११ च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पक काढली जात नाही. तशा पद्धतीचे ब्रीफिंग पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त अभिवादन करायला येणाऱ्या मान्यवरांना करत असतात. हा नियम आहे”, असं केशव उपाध्येंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

VIDEO : आता २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांचा राज्यपालांकडून अवमान? व्हिडिओ शेअर करत काँग्रेसकडून टीका

“आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पायातून बूट काढल्याने नंतर मग सर्वांनी ते काढले. गेल्या वर्षीचा हा व्हिडीओ पाहा. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अभिवादन करत आहेत आणि त्यांच्या पायात बूट आहेत. मग तेव्हाही मराठी संस्कृती न जपल्याची आठवण आपल्याला झाली होती का?” असा सवाल केशव उपाध्येंनी आपल्या ट्वीटमधून केला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी सीएनबीसी टीव्ही-१८चं गेल्या वर्षीचं ट्वीट शेअर केलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरेही पायात बूट घालून अभिवादनासाठी जाताना दिसत आहेत.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘व्हिडीओ वॉर’ सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:09 IST

संबंधित बातम्या