मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा हा केवळ दिखावा असून हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे. या परिस्थितीस भाजप व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिले. देशातील आरक्षण संपविणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा कार्यक्रम आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच देवेंद्र फडणवीस यांनीच निर्माण केला.  २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींच्या रोश्टरसाठी एक परिपत्रक काढून  निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मुद्दाही न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आयोग नेमण्याचे निर्देश देऊनही फडणवीस यांनी काही केले नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले, असा आरोप पटोले यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले; परंतु  ओबीसींचा शास्त्रीय सांख्यिकी तपशील देण्यास केंद्र सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र मोदी सरकारने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही, असे पटोले यांनी सांगितले.

राजकीय द्वेषापोटी दूरध्वनी टॅपिंग

फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे दूरध्वनी टॅपिंग करण्यात आले होते. गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे केले होते. केवळ राजकीय द्वेषापोटी ते करण्यात आले असून खरा सूत्रधार कोण, हे उघड झाले पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.