scorecardresearch

सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद; काँग्रेस, राष्ट्रवादीचा संताप, म्हणाले “मानसिक स्थिती…”

किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याने खळबळ; फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी उभे असल्याचं दिसत आहे

BJP, Kirit Somaiya, Urban Developement Ministry, Congress, Sachin Sawant, NCP
किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याने खळबळ; फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी उभे असल्याचं दिसत आहे

महाविकासआघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं सातत्याने समोर आणत निशाणा साधणारे भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या वादात अडकले आहेत. किरीत सोमय्यांचा एक फोटो या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासत होते. सरकारी अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली असून फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.

सचिन सावंत यांचा आक्षेप –

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरुन टीका केली असून म्हटलं आहे की, “भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे. महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे”.

“किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया –

“नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही,” असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही म्हणाले. दरम्यान किरीट सोमय्या यांनी आरटीआयअंतर्गत आपण माहिती मागितली होती असा दावा केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp kirit somaiya checks files of urban developement ministry cause controversy photo viral congress ncp sgy

ताज्या बातम्या