भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याने मुंबईत पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा प्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. तसंच कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणादेखील त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिलं आणि त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली. म्हणून अधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो आहे,” असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

“मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी पुढील मंगळवार आणि बुधवारी जाणार आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान त्यांनी दौऱ्यासाठी परवानगी मिळेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशाप्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? किरीट सोमय्याला एवढे का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानतंर हे काय करणार?”.

भ्रष्टाचारी मंत्र्यांवर डिसेंबरपर्यंत कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणारे किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे जात असताना कराड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर कराड येथे पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.

किरीट सोमय्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला गेलेले, पण पोलिसांनी रोखल्याने कराडहून परतलेल्या सोमय्या यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केलं होतं. या वेळी सोमय्या यांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि महाराष्ट्र ३१ डिसेंबरपर्यंत भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनविला, असा आरोप करून सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे १९ बेकायदेशीर बंगले बांधले असून त्यांची पाहणी करण्यासाठी मी या आठवड्यात अलिबागला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya files complaint against mumbai police demand aplogy sgy
First published on: 22-09-2021 at 12:32 IST