सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी शिवसेना नेते अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी जवळपास १३ ते १४ तास चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली अशी माहिती दिली. अनिल परब यांच्यावरील कारवाईचे पडसाद महाविकास आघाडीत उमटत आहेत. त्यातच आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

सांडपाण्याबाबतच्या तक्रारीवरून छापे; ईडी कारवाईप्रकरणी अनिल परब यांचा दावा

“ईडी अधिकारी कशासाठी आले होते हे मला माहिती नाही, माझा रिसॉर्टशी संबंध नाही असं अनिल परब म्हणतात. १७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. तो मी नव्हचे नाट्यकार अनिल परब यांनी याचं उत्तर द्यावं. याआधीही अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात,” असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

विश्लेषण: अनिल परब यांच्यावर ईडीने धाड टाकण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांचं शिवसेनेतील महत्व का वाढलं?

“१६ हजार ६८३ स्क्वेअर फिटचं बांधकाम असून घर क्रमांक १०६२ यांच्या मालकीचं आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही सांगतात,” असं सोमय्या म्हणाले. “अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. अनिल परब यांनी महावितरणला अर्ज केला होता असंही सोमय्यांनी सांगितलं.

सांडपाण्याबाबतच्या तक्रारीवरून छापे; अनिल परब यांचा दावा

ईडीने दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही आणि अद्याप काम पूर्ण होऊन ते रिसॉर्ट सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल करत शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला हास्यास्पद ठरवले. पण कोणत्याही चौकशीला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ईडीचे अधिकारी १३ तासांच्या चौकशीनंतर मंत्रालयासमोरील अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानावरून निघाले. त्यानंतर अनिल परब यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपासून ईडीची कारवाई होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या. ईडीच्या लोकांकडे गुन्हा काय याची विचारणा केली असता दापोली येथील साई रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी सोडले जात असल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून त्याप्रकरणात ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.