किरीट सोमय्या यांचा इशारा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांचा ‘अलीबाबा आणि ४० चोर’ असा उल्लेख करीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई होईल, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दिला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला गेलेले, पण पोलिसांनी रोखल्याने कराडहून परतलेल्या सोमय्या यांचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी सोमय्या यांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे  आरोप केले आणि महाराष्ट्र ३१ डिसेंबरपर्यंत भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे जाहीर केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनविला, असा आरोप करून सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे १९ बेकायदेशीर बंगले बांधले असून त्यांची पाहणी करण्यासाठी मी या आठवड्यात अलिबागला जाणार आहे.

मुंबई पालिकेवर आरोप

मुंबई महापालिकेच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याचे सांगून महापालिकेने निविदा काढल्या. हाफकिन इन्स्टिट्यूटने रेमडेसिवीर प्रति इंजेक्शन ६६५ रुपयांमध्ये घेतले असताना मुंबई महापालिकेने मात्र एक इंजेक्शन एक हजार ६६५ रुपयांना विकत घेतले. महानगरपालिकेने ७७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन घेतली आणि ७७ कोटी रुपये कमावले. ही रक्कम कोणाच्या खिशात गेली, असा सवाल सोमय्या यांनी केला.

 मुंबई महापालिकेने एक कोटी लशींचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या असताना पुढे आलेल्या ११ कंपन्या बनावट होत्या, हे सिद्ध केल्याने महापालिकेला निविदा रद्द करावी लागली होती, असे सोमय्या यांनी सांगितले.  मुलुंड पोलिसांनी मला बेकायदेशीरपणे सहा तास घरी कोंडून ठेवले. ही पोलिसांची दडपशाही होती. संबंधित अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

मुंबईकडे रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणारे किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे जात असताना कराड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर कराड येथे पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हाधिकारी व पोलिसांवर सोमय्यांनी टीका केली. सकाळी दहाच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.

‘…हा बंदोबस्त मुश्रीफांच्या अटकेसाठी हवा होता’

कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करून तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात. तर पोलीस चुकीचे आदेश दाखवून मला गणेश विसर्जनापासून रोखून घरातच कोंडून ठेवण्याचा प्रकार करतात याला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व राज्यातील आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करताना, कोणत्याही परिस्थितीत कागलला जाऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा  दिला.

फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढायाची वेळ – पटोले

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे सूतोवाच करणाऱ्या भाजपलाच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आता फडणवीस सरकारच्या काळातील काही फायली काढण्याची वेळ आली आहे, असा इशारा दिला आहे.  देशात आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप पटोले यांनी केले.   राज्याच्या स्थापनेला  ६० वर्ष झाली आहेत. या काळात काँग्रेस सरकारांनी केलेली कामे आणि भविष्यात महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, याचा कार्यक्रम घेऊन गावागावांपर्यंत जाणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.