सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. याच धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरात मुस्लिम महिलांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. तसंच हा कायदा मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईत शाहीनबागचा तमाशा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हे प्रकार बंद होते. मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केल्यानंतर अशा प्रकारांना ऊत येणे स्वाभाविकच नाही का? असा सवाल भातखळकर यांनी ट्वीटरवरून केला आहे. रझा अकादमीवर आझाद मैदानावर घडलेल्या दंगलीचा आरोप आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईतील नागपाडा परिसरातील मुस्लिम महिलांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. तसंच आंदोलकांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आलं होतं. परंतु हा कायदा मागे घेत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रझा अकादमीच्या २०० पदाधिकारी आणि नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आम्ही राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती असं रझा अकादमीच्या सय्यद नुरी यांनी सांगितलं होतं.