मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी दिलं उत्तर

fadnavis raj thackeray
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी दिलं उत्तर

महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनात पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना विचार जुळल्यास युतीसंदर्भात निर्णय घेता येईल. मात्र दोन्ही पक्षांची क्षेत्रीय अस्मितेसंदर्भातील मतं जुळली नाही तर मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं मनसेसोबतच्या युतीबद्दल फडणवीसांनी म्हटलं आहे. सध्या तरी भाजपा आणि मनसे या दोन पक्षांचे विचार जुळत नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या आमच्यासोबत युतीमध्ये असणाऱ्या लहान पक्षांना सोबत घेऊनच आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत, असं फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. त्यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी नवीन एखादा कोणी येईल असं वाटतं का असा प्रश्न विचारला. यावर फडणवीस यांनी थेट उत्तर देताना तुमचा इशारा मनसेकडे असल्याचं मला कळतंय. तर मी स्पष्टपणे सांगतो की, मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलंय किंवा स्वीकारत आहेत, असं म्हटलं.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे. जी काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करु. पण क्षेत्रीय अस्मितेसोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिताही आम्हाला महत्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घ्यायचं आम्हाला योग्य वाटतं नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही, या मताचे आम्ही आहोत असंही फडणवीस म्हणाले. ही मतं आता तरी आमची आणि मनसेची वेगवेगळी आहेत. ती मतं जुळी तर वेगळा विचार करता येईल. पण आज तरी ती जुळत नाहीयत. ती जुळत नसली तर युतीचा कोणता प्रश्नच निर्माण होत नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader devendra fadnavis about alliance with mns at loksatta drushti ani kon scsg