BJP Leader K Annamalai : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या विविध ठिकाणी सभा आणि मेळावे पार पडत आहेत. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी मुद्दा गाजत आहे. यातच भाजपाचे तमिळनाडूमधील नेते के.अण्णामलाई यांनी ‘मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही’, असं वक्तव्य केल्यानंतर राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर ठाकरे बंधूंची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी के.अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरून भाजपावर जोरदार टीका केली. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेनंतर आता के.अण्णामलाई यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंना खुलं आव्हान दिलं आहे. ‘मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा’, असं के.अण्णामलाई यांनी म्हटलं आहे.
अण्णामलाई यांनी काय म्हटलं?
राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अण्णामलाई यांनी म्हटलं की, “आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत जे मला धमकावतात? मला शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा अभिमान आहे. त्यांनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी बैठका आयोजित केल्या आहेत. मला माहित नाही की मी इतका महत्त्वाचा का झालो आहे? काही लोकांनी लिहिलं की जर मी मुंबईत आलो तर ते माझे पाय छाटतील? मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा. जर मला अशा धमक्यांची भीती असती तर मी माझ्या गावातच राहिलो असतो”, असं अण्णामलाई यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?
पत्रकार परिषद बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. गर्जना चांगली असली तरी तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणतात. यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही, हे भाजपाचे स्टार प्रचारक सांगत आहेत. अण्णामलाई असं बोलत असतील तर त्यांच्याविरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी ते असं विधान कसं करू शकतात? १०६ हुतात्म्यांचा अवमान भाजपाच्या अण्णामलाई यांनी केला असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. कुठे आहे तुमचे स्वाभिमानी बाणा?”, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
अण्णामलाई यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
भाजपाचे नेते के.अण्णामलाई प्रचारादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले की, “मुंबईच्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे. तुम्ही चेन्नई शहरात पाहिलं तर तिथे डीएमकेची सत्ता आहे आणि केंद्र भाजपा. बंगळुरू आणि हैदराबादमध्येही खाली काँग्रेस आणि वर भाजपा आहे. मुंबई असं एकमेव शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे.”
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच… भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका… पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर… pic.twitter.com/EVp9SA8QhM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 9, 2026
‘बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही’
के.अण्णामलाई म्हणाले होते की, “बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही. हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या मनपाचं बजेट ७५ हजार कोटी आहे. चेन्नई ८ हजार आणि बंगळुरूचं बजेट १९ हजार कोटी आहे. त्यामुळे या शहराचं नियोजन करण्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे.”
