अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीस स्थानकामधून भेटून येताना भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. खार पोलीस स्थानकाबाहेरील अरुंद रस्त्यावर सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या हल्ल्यामध्ये सोमय्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून काचा लागल्याने सोमय्या किरकोळ जखमी झालेत. या हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी जोपर्यंत पोलीस आयुक्त संजय पांडे येथे येत नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही अशी भूमिका घेतलीय. या हल्ल्यानंतर सोमय्या वांद्रे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेत मात्र तिथे त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिलाय.

नक्की वाचा >> शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्यानंतर फडणवीस संतापून म्हणाले, “Z सुरक्षा असणाऱ्याला पोलीस सुरक्षा देऊ शकत नसतील तर..”

खूनाचा गुन्हा दाखल करावा
“पोलीस आयुक्त इथे पोलीस स्थानकाच्या आवारात येत नाही तोपर्यंत मी गाडीमधून खाली उतरणार नाही,” अशी भूमिका सोमय्यांनी घेतलीय. “पोलीस स्थानकाच्या बाहेर असा भ्याड हल्ला केलाय. मला तरी झेड सिक्युरीट आहे सामान्य भाजपा कार्यकर्त्याचं काय?” असा प्रश्न सोमय्यांनी विचारलाय. “आधी पोलीस आयुक्तांनी इथे येऊन त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं. हल्ला करणाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा त्याशिवाय मी गाडीमधून खाली उतरणार नाही,” असं सोमय्या म्हणाले.

त्याशिवाय मी खाली उतरणार नाही
“संजय पांडे उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का? लाज वाटत नाही संजय पांडे उद्धव ठाकरेंच्या चपरासीसारखे वागताय. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये, पोलीस स्थानकाच्या आवारात ८० गुंड घुसतात आणि खून करण्याचा प्रयत्न करतात. पहिले उद्धव ठाकरेंच्या त्या गुंडावर खूनाचा गुन्हा दाखल करा. त्याशिवाय मी खाली उतरणार नाही,” असं सोमय्या म्हणाले. सोमय्यांची गाडी सध्या वांद्रे पोलीस स्थानकासमोर आहे.

नक्की वाचा >> शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी: “मी सरकाला इशारा देतोय की…”; गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याच सांगत फडणवीसांचा संताप

सोमय्यांच्या गाडीवर चप्पलाही फेकल्या
या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झालीय. किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामधून बाहेर आल्यानंतर काही अंतरापर्यंत पोलिसांनी जमलेल्या शिवसैनिकांना गाडीपासून दूर ठेवले. मात्र समोरच मेट्रोचं काम सुरु असल्याने अरुंद रस्त्यावरुन जाताना गाडीचा वेग पुढे जाऊन मंदावला. याच संधीचा फायदा घेत काही जणांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. काहींनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पलाही फेकल्या. सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत काहीजण मोठ्याने शिवीगाळ करत होते.

उद्धव ठाकरेंना शोभतं का हे?
सोमय्यांसोबत गाडीने प्रवास करणाऱ्या सहकाऱ्याने या हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. “हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र राहिलेला नाही हा मुघलांचा महाराष्ट्रा झालाय. भाडोत्री गुंड पोलीस स्थानकाबाहेर शिवीगाळ करतायत, शिव्या देतायत. इथे दिसतंय की गाडीवर दगडफेक झालीय. मोडतोड झालीय. किरीट सोमय्यांच्या बाजूला मी बसलेले त्यांच्या हनुवटीला काच लागलीय. दगड त्यांच्या हाताला लागलाय. हे कोणाचं राज्य आहे?, उद्धव ठाकरेंना शोभतं का हे?”, अशा शब्दांमध्ये या व्यक्तीने संताप व्यक्त केलाय.