भाजपा नेत्याने नवाब मलिकांवर दाखल केला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा; जाणून घ्या कारण

भाजपा नेत्याने नवाब मलिकांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

nawab-malik-criticizes-narayan-rane-his-controversial-statement-on-cm-uddhav-thackeary-gst-97 
(Photo : File)

मुंबईतील क्रुझवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भाजपाशी संबधित असलेल्या मोहित कंबोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीनं ताब्यात घेतल होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. तर, मुंबईतील भाजपाच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी शनिवारी मुंबई हायकोर्टात नवाब मलिक यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

“माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप लावल्याबद्दल मी नवाब मल्लिक यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात १०० कोटींच्या नुकसानीचा दावा दाखल केला आहे,” असं त्यांनी ट्विट करून सांगितलं.

दरम्यान, नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले होते. “मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप लावले की एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. पण माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही आणि मी दीड वर्षांपासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेवा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे? याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, आर्यन खान सोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत. मात्र, नवाब मलिक यांन केलेल सर्व आरोप खोटे आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवा याला सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मुंबईमधील भाजपाच्या युवा विभागाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या मेहुण्याचाही समावेश असल्याचं म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader mohit kamboj files defamation suit against nawab malik over his allegations in drugs case hrc