मुंबई : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकारणातून माझगाव न्यायालयाने बुधवारी दोषमुक्त केले.
माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी राणा यांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला. तथापि, राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांच्याविरुद्धचे प्रकरण सुरू राहणार असून, त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाने सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नवनीत यांना निवडणूक लढवण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तर उच्च न्यायालयातही जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने २०२१ मध्ये राणा यांना मिळालेले जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि फसवणूक करून मिळवण्यात आल्याचे स्पष्ट करून रद्द केले होते. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र पुन्हा वैध ठरवले. त्यामुळे, त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाली होती.
