मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने (रिपाइं) मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजकपडे १६ जागांची मागणी केली आहे. महायुतीचे मुंबईतील जागावाटप रखडल्याने ‘रिपाइं’च्या जागांचा निर्णय झालेला नाही. उमेदवारी दाखल करण्यास दोन दिवस बाकी असून ‘रिपाइं’ला किती जागा सुटणार यासंदर्भात कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वंचितला काँग्रेसने ६२ जागा सोडल्याने आठवले गटाला अधिक जागांची अपेक्षा आहे.
‘रिपाइं’कडून सातत्याने जागांची मागणी होत असल्याने भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी आठवले यांची वांद्रे येथील ‘संविधान’ निवासस्थानी भेट घेतली. भाजपकडून ‘रिपाइं’ला मुंबईत सन्मानजनक जागा सोडल्या जातील. ‘रिपाइं’ महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष आहे, असा विश्वास दरेकर यांनी दिला.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडे २६ जागांची यादी दिली आहे. ‘रिपाइं’चा मुंबईत, आमदार-खासदार नसला तरी वस्त्यावस्त्यामध्ये आमचे मतदार आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबईत किमान १६ जागांची अपेक्षा आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपाइंला सन्मानाने बोलाविले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे, असे दरेकर यांच्याबरोबरील भेटीत आठवले यांनी स्पष्ट केले.
वंचितमुळे दबाव वाढला
दुसरीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ने मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. ‘वंचित’ला ६२ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत अधिक जागा मिळवण्यासाठीचा आठवले यांच्यावरील कार्यकर्त्यांचा दबाव वाढतो आहे. मुंबईत अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग आरक्षीत आहेत. अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या १६ लाखाच्या आसपास आहे.
कवाडे गट संभ्रमात
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’ने मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेकडे ८ जागांची मागणी केली आहे. मात्र भाजप-शिवसेनेचे जागा वाटप रखडल्याने ‘पीआरपी’चे कार्यकर्ते अधांतरी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ‘पीआरपी’ची युती आहे. कवाडे गटाचा मुंबई महापालिकेत नगरसेवक यापूर्वी निवडून आलेला नाही. भाजपकडून ‘रिपाइं’ला ज्या जागा सोडल्या जातील, त्या जागा भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर आम्ही लढण्यास तयार आहोत.
निवडणुकीनंतर आम्ही महापालिकेत ‘रिपाइं’ला स्वतंत्र गट म्हणून मान्यता घेवू शकतो. १९९२ मध्ये कॉग्रेसच्या पंजा चिन्हावर रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता. -रामदास आठवले, अध्यक्ष रिपाइं व केंद्रीय राज्यमंत्री
