मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेची बोगस मजूर म्हणून निवडणूक लढविल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी सोमवारी चौकशी केली. आपल्यावर राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आपली चौकशी करणाऱ्या पोलिसांवरही प्रचंड राजकीय दबाव होता, असा आरोप दरेकर यांनी चौकशीनंतर केला.

दरेकर यांनी प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बॅंकेची निवडणूक लढविली आणि ते मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून आले. परंतु, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून मानधन घेणारे मजूर कसे असू शकतात, असा सवाल उपस्थित करणारी वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने १० ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची दखल घेऊन विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सभासद म्हणून अपात्र ठरवले. त्यामुळे दरेकर हे आतापर्यंत बोगस मजूर म्हणून निवडणूक लढवित होते, हे स्पष्ट झाले. दरेकर यांनी बँक व ठेवीदारांची तसेच शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली.

या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ४१ (अ) अंतर्गत दरेकर यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दरेकर पोलीस ठाण्यात हजर झाले. सकाळी ११.३० च्या सुमारास दरेकर यांची चौकशी सुरू झाली व दुपारी तीन वाजता त्यांना चौकशीनंतर जाऊ देण्यात आले. आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलवू, असेही चौकशी अधिकाऱ्यांनी दरेकर यांना सांगितले.  

आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी अटकपूर्व जामिनासाठी दाद मागण्याची मुभा देताना तोपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता. त्यानंतर दरेकर यांनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळण्यात आला. त्या विरोधात दरेकर यांनी उच्च न्यायालयात अपील केले. मात्र, याबाबत सुनावणी प्रलंबित आहे. मात्र तोपर्यंत दरेकर यांना अटकेपासून उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरेकर यांची चौकशी केली. मजूर म्हणून प्रतिज्ञा मजूर संस्थेत कधी सभासदत्व देण्यात आले, या सभासदत्वासाठी कोणती कागदपत्रे सादर केली, आपण अंगमेहनत कधी व कुठल्या स्वरुपाची केली, आतापर्यंत किती मजुरी घेतली, मजूर संस्थेस आतापर्यंत किती कर्ज प्राप्त झाले आणि त्याचा विनियोग कसा करण्यात आला, मजूर संस्थेमार्फत मुंबई जिल्हा मजूर फेडरेशन संस्थेवर आपली प्रतिनिधी म्हणून कोणत्या ठरावाद्वारे प्राधिकृत करण्यात आली, आदी प्रश्न यावेळी दरेकर यांना विचारण्यात आले. या प्रश्नांची दरेकर यांनी दिलेली उत्तरे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. त्याबाबत सहकार विभागाकडेही विचारणा केली जाणार आहे. सहकार विभागाने दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांनी बँक, ठेवीदार तसेच शासनाची फसवणूक केली, या मुख्य आरोपाभोवतीच चौकशी करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

‘दरेकरांची ईडी, प्राप्तिकर विभागाने चौकशी करावी’

मुंबई : प्रवीण दरेकरांनी केलेल्या २००० कोटींच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे सहकार विभागाने पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहेत़ आता त्यांची खरी जागा ही तुरुंगातच असून, या गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ आणि प्राप्तिकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आह़े