मुंबई : मुंबै बँकेच्या निवडणुकीत ‘बोगस’ मजूर ठरलेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी पुन्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दरेकर यांची सोमवारी तीन तास चौकशी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने चौकशीच्या नावाखाली आपला छळ मांडला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. दरेकर हे ‘बोगस’ श्रीमंत मजूर असल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १० ते १२ डिसेंबर २०२१ रोजी पहिल्यांदा प्रकाशित केले. या वृत्तानंतर सहकार विभागाच्या सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र  केले. त्यामुळे दरेकर हे बोगस मजूर असल्याचे स्पष्ट झाले. बँकेचे अध्यक्ष व संचालक म्हणून दरेकर यांनी बोगस मजूर बनून मुंबै बँकेची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर लगेच दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. मात्र ती मान्य झाली नाही. दरेकर यांनी सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला गेला. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्याची सुनावणी प्रलंबित असून तोपर्यंत दरेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ४ एप्रिल रोजी दरेकर यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.  आपण मजूर कसे व कधी होतात, या प्रश्नाभोवती प्रामुख्याने चौकशी केंद्रित करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांनी दरेकर यांच्याकडे कागदपत्रे मागितली आहेत. बँकेतील कथित आर्थिक घोटाळय़ाप्रकरणीही दरेकर यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र दरेकर यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.