राऊत यांच्या भूमिकेला भास्कर जाधव यांचा पाठिंबा

मुंबई : भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांवर आरोप करत त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापे-नोटीस अशी कारवाई करत दबावतंत्राचे राजकारण करत असल्याने त्यास एकजुटीने उत्तर देण्याची रणनीती शिवसेना-राष्ट्रवादी आखत आहे.

 शिवसेनेतून खासदार संजय राऊत हेच भाजपवर हल्ला चढवत असल्याचे चित्र असताना आता सर्व मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. तर भाजपच्या दबावतंत्राला सरकार घाबरणार नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते  नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

भाजप दबावाचे राजकारण करत असल्याने व जवळपास रोज भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत असल्याने एकटा मी त्यांना उत्तर देण्यापेक्षा इतरांनीही बोलले पाहिजे अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त के ली होती. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भाजपने आरोप करत ईडीची नोटीस पाठवल्यानंतर शिवसेनेचा एकही मंत्री भाजपच्या राजकारणाविरोधात आक्रमकपणे बोलत नाही, असेच चित्र आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या विधानानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही राऊत यांच्या भूमिके चे समर्थन करत महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्र्यांनी एकजुटीने भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

वैफल्यातून भाजपचे आरोप – बाळासाहेब थोरात

 ठाणे : महाविकास आघाडीचे सरकार कसे पाडता येईल, यासाठी ईडी सारख्या संस्थांचा उपयोग केला जात असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सरकार भक्कम असल्याचा दावा थोरात यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.  सरकार पडेल  या आशेवर भाजप नेते होते. यातूनच नैराश्य आल्याने ते काहीहीआरोप करीत आहेत असा टोला थोरात यांनी  लगावला.  तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेळेनुसार निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले. काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्यावेळी थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.