भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपाने सध्या देशभरामध्ये चर्चा असणाऱ्या आर्यन खान प्रकरणामध्ये अडचणीत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्र्यांविरोधात तक्रार केलीय. नवाब मलिक यांच्याकडून केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं खच्चीकरण केलं जात असून ते करत असणाऱ्या या कामासाठी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने केलीय. राज्यपालांना यासंदर्भात एक रितसर पत्र मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भेटीस गेलेल्या भाजपाच्या नेत्यांनी दिलं आहे.

“महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळामधील मंत्री नवाब मलिक ज्या प्रकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या खात्यामधील एक विभागीय संचालक असणाऱ्या समीर वानखेडे यांच्याविरुद्ध व्यक्तिगत आरोप करत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही केंद्रीय एजन्सी असून त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम राज्य सरकारने आणि त्यांच्या अदिकाऱ्यांकडून व्हावे अशी अपेक्षा आहे. परंतु मनोबल वाढवणे तर दूरच उलट नवाब मलिक सतत समीर वानखेडे यांच्यावर निराधार आरोप करत सुटले आहेत,” असं भाजपाने दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“मलिक हे वानखेडेंना उघड-उघड धमक्या देखील देत आहेत. याचा केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना एक प्रकार समर्थनच मिळत आहे. या ड्रग्ज प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांविरोधात कारवाई होऊ नये यासाठी घडपडणाऱ्या राज्याच्या मंत्री महोदयांचे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. नार्कोटिक्स ब्युरोच्या कामामध्ये अडथळा आणणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. संविधानाची शपथ घेऊन सरकारमध्ये बसलेले मंत्री असे असंविधानिक कार्य कसे करु शकतात? त्यांनी संविधानाच्या मर्यादेचं पालन करुनच कार्य करावे,” असंही पत्रात म्हटलंय.

“आपण राज्याचे संविधानिक प्रमुख असल्याने आपणाकडून अशी अपे७ा आहे की राज्यामध्ये अराजकता पसरविणाऱ्या नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना यापारून दूर ठेवण्याचे निर्देश द्यावेत आणि असा गैर जबाबदार मंत्र्यांच्या विरुद्ध कारवाईची अपेक्षा आहे,” असं म्हणत पत्राचा शेवट करण्यात आलाय.

लोढांबरोबरच उपाध्यक्ष आचार्य त्रिपाठी, अमरजीत मिश्रा आणि दक्षिण मुंबईचे भाजपा जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर यांच्या स्वाक्षऱ्यांसहीत हे पत्र देण्यात आलं आहे.