राज्यात चार टप्प्यांमध्ये झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नोटाबंदी, मराठा समाजाचे मोर्चे अशा मुद्दय़ांमुळे विरोधी वातावरण असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले आहेत. विदर्भात भाजपची घोडदौड होत असताना मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्य़ात रविवारी झालेल्या निवडणुकीत मात्र निर्विवाद यश मिळाले नाही. भाजपच्या विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री फडणवीस ठरले आहेत. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकरिता नगरपालिकांचा निकाल भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो.

चौथ्या टप्प्यात विदर्भातील ११ नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक सात नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्य़ातील नऊपैकी पाच पालिकांचीच नगराध्यक्षपदे भाजपला मिळाली आहेत. उर्वरित प्रत्येकी दोन काँग्रेस व स्थानिक पक्षांना मिळाली आहेत. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला एकहाती यश मिळाले होते. या तुलनेत नागपूर जिल्ह्य़ात मात्र भाजपला निर्विवाद यश मिळालेले नाही. जिल्ह्य़ातील सर्व नगरपालिका जिंकू, असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी प्रचाराच्या काळात व्यक्त केला होता; पण चार पालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. या पालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. अति महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या बावनकुळे यांना हा मोठा फटका मानला जातो. पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांच्यापाठोपाठ बावनकुळे या मंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला.

bjp-party-chart

पालिका निवडणुकांपूर्वी मराठा समाजाच्या मोच्र्यामुळे वातावरण तापले होते. त्यातच पालिका निवडणुकांच्या तोंडावर नोटाबंदीच्या निर्णयाने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चलबिचल सुरू झाली होती. मात्र, या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सारी सूत्रे हाती घेतली. राज्यभर दौरे केले आणि त्याचा फायदा भाजपला झाला. सत्ताधारी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फायदा होतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याप्रमाणे भाजपला यश मिळाले. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची मात्र तशी पीछेहाट झाली आहे. अर्थात, शिवसेनेच्या नेतृत्वाने या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवरच सूत्रे हलविण्यात आली होती. पक्षीय पातळीवर आनंदीआनंद असताना काँग्रेसला मिळालेल्या यशाने पक्षातही आश्चर्य व्यक्त केले जाते. सामान्य जनता अजूनही काँग्रेसच्या मागे असल्याचा संदेश गेला आहे.

नगराध्यक्ष आणि सत्ता

भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी अनेक ठिकाणी पालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळालेले नाही. आजच सात नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले असले तरी त्यापैकी दोन पालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सदस्यसंख्या जास्त आहे. बहुमत नसल्याने नगराध्यक्षांवर काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सरकारने नगराध्यक्षांना जादा अधिकार दिले आहेत. काहीही करून भाजपची छाप पडली पाहिजे, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.

निर्णय फायदेशीर 

नगराध्यक्षांची थेट निवडणूक घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरला आहे. १९१ नगरपालिकांमध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ७१ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. राष्ट्रवादीची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली आहे.