मुंबई : विधान परिषदेसाठी भाजपने सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेेंडे, प्रमोद जठार आणि विवेक कोल्हे यांना उमदेवारी जाहीर करताना जुन्याजाणत्या व निष्ठावान नेत्यांना संधी दिली आहे. गेली काही वर्षे बाहेरच्या पक्षातील नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देणाऱ्या भाजपच्या धोरणात झालेल्या बदल लक्षणीय आहे. भाजपची ताकद वाढल्याने आता अन्य पक्षातील नेत्यांची तेवढी गरज भासलेली नाही, असा अर्थ काढला जात आहे.
विधानसभेतील संख्याबळामनुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. यानुसार पक्षाने पाच जणांची उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसच्या जॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता भाजपने सातव यांनाच उमेदवारी दिली आहे.
गेली काही वर्षे राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठी बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना अधिक संधी दिली जात असल्याने निष्ठावान व जुन्याजाणत्यांमध्ये नाराजीची भावना होती. हे चित्र यंदा पक्षाने बदलले आहे. माजी संघटनमंत्री व जुने पूर्णवेळ कार्यकर्ते सुनील कर्जतकर, कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार, नागपूर सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, प्रदेश सरचिटणीस व ठाण्यातील माजी नगरसेविका ॲड. माधवी नाईक या जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळालेले विवेक कोल्हे हे सहकारी चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत.
गेली काही वर्षे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्यांना संधी दिली जात असे. अगदी गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली होती. यापूर्वी शेकापतून आलेल्या धैर्यशील पाटील यांना खासदारकी देण्यात आली होती. बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पक्षात महत्त्व मिळत असल्याने जुनेजाणते नेते नाराज होते. यंदा पक्षाने उमेदवारी देताना निकष बदलले आहेत. पाचपैकी चार जण हे निष्टावान किंवा जुनेजाणते नेते आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्चात भाजपने आपला जम बसविला. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. यामुळेच भाजपला आता अन्य पक्षातील नेत्यांनी तेवढी गरज उरलेली नसावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२९ मध्ये स्वबळावर सत्तेचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दृष्टीनेही भाजपची पावले पडायला लागलेली दिसतात.
जातीचे समीकरण साधले
पक्षाने उमेदवारी देताना ब्राह्मण, मराठा, ओबीसी, महिला व अनुसूचित जाती असे समीकरण साधले आहे. कर्जतकर व कोल्हे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. जठार सिंधुदुर्ग, माधवी नाईक या ठाण्याच्या तर संजय भेंडे हे नागपूरचे आहेत. पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी देण्यात आलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या मराठवाड्यातील आहेत. यातून सर्व विभागांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
विद्यमान आमदारांना वगळले
भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे हे चार आमदार निवृत्त होत आहेत. पक्षाने उमेदवारी देताना या चौघांनाही वगळले आहे. यापैकी संदीप जोशी यांनी आपण निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले होते. मोहिते-पाटील यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघात घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली होती. केनेकर व केचे यांची पोटनिवडणुकीत विधान परिषदेत निवड झाली होती. या दोघांना सहा वर्षे आमदारकी मिळालेली नाही. तरीही पक्षाने त्यांचा विचार केलेला नाही.
कर्जतकर, नाईक, जठार यांना संधी
सुनील कर्जतकर हे गेली अनेक वर्षे पक्षात विविध पदे भूषवित आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून कर्जतकर हे पक्षाचे पदाधिकारी होती. त्यांना आमदारकी देऊन जुन्या कार्यकर्त्याचा गौरव केल्याची भावना पक्षात व्यक्त केली जात आहे. ठाण्याच्या माधवी नाईक या महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या प्रदेशमध्ये सरचिटणीस असून, विमानतळ प्राधिकरणाच्या त्या सदस्या आहेत. त्यांच्या रुपाने महिला व अनुसूचित जातीला पक्षाने प्रतिनिधीत्व दिले आहे. प्रमोद जठार हे माजी आमदार आहेत. नारायण राणे भाजपवासी झाल्यापासून जठार काहीसे मागे पडले होते. त्यांना पक्षाने संधी देऊन कोकणात भाजपला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. राणे यांनाही हा सूचक इशारा मानला जातो.
