मुंबई: मुंबईत महापालिकेत सत्तेवर येऊन भारतीय जनता पक्षाला २०० दिवस पूर्ण झाले असून मुंबई भाजपच्या १ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत गेल्या २०० दिवसांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मांडलेल्या राजकीय प्रस्तावात मुंबई महापालिकेतील पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चात बचत आणि नागरिकांचा सहभाग या चार प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. प्रस्तावात महापालिकेतील जुन्या कार्यपद्धतींवर आणि मागील २५ वर्षांच्या कारभारावर टीका करत येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प करण्यात आला.
मुंबई महापालिकेतील कारभारात पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याचा निर्धार भाजप मुंबईच्या कार्यकारिणी बैठकीत मांडलेल्या राजकीय प्रस्तावातून करण्यात आला आहे. मंगळवारी दादर येथील भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. महायुती महापालिकेमध्ये सत्तेवर आल्यावर २०० दिवस पूर्ण झाले आहेत. हा काही फार मोठा कालावधी नाही. पण २०० दिवसांत जर व्यवस्थेची दिशा बदलण्यास सुरुवात झाली असेल, तर पुढील ५ वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या बदलामध्ये नक्कीच आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापालिकेच्या विविध खरेदी प्रक्रियेत मध्यस्थ आणि कंत्राटदारांऐवजी थेट पुरवठादारांकडून खरेदी करण्यासाठी जेम पोर्टलचा वापर सुरू करण्यात आल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीतून पहिल्याच वर्षी सुमारे ४५ कोटी रुपयांची बचत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता महापालिका रुग्णालयांतील औषधे आणि रुग्णालयातील साहित्याची खरेदीही जेम पोर्टलवरून करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. महापालिकेच्या विविध प्रस्तावित कामांच्या निविदांची छाननी करून खर्चात बचत केल्याचा दावाही या प्रस्तावात भाजपने करीत स्वतःची पाठ थोपटली आहे.
जन्म मृत्यू नोंदणीतील जबाबदार व्यक्तींवर आरोपपत्र जन्म-मृत्यू नोंदणीतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीत सुमारे ८७ हजार संशयास्पद किंवा बनावट जन्मनोंदींचा मुद्दा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पुढील काळात जबाबदार व्यक्तींवर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे प्रस्तावात नमूद आहे.
येत्या काळातील कामांचा आढावाही या प्रस्तावात येत्या काळातील कामांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयआयटी मुंबईच्या मदतीने वैज्ञानिक अभ्यास सुरू असून १३ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार देणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १४ वर्षांच्या मुलींसाठी एक लाखांहून अधिक एचपीव्ही लसीकरणाचे उद्दिष्ट, २७ ठिकाणी भूमिगत वाहनतळ, ऑनलाइन वाहनतळाची उपलब्धता प्रणाली, मराठी भाषेच्या प्रसारासाठी विशेष उपक्रम, भायखळ्याच्या राणीच्या बागेत दोन आशियाई सिंह आणण्याचा प्रस्ताव आणि तरुणांसाठी झेन झी फेलो अशा उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाकरेंच्या कारभारावर टीका
या बैठकीत गेल्या २५ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कारभारावर टीका करण्यात आली. मुंबईकरांच्या पैशाचा योग्य वापर झाला का? २५ वर्षे सतत सत्ता देऊन सुद्धा हेच प्रश्न मुंबईकरांसमोर आजही आ वासून उभे आहेत. गेल्या २५ वर्षांचा बॅकलॉग एका दिवसात भरून निघणार नाही. पण तो भरून काढण्यासाठी पारदर्शकता, तंत्रज्ञान, तज्ज्ञांचा अभ्यास, आर्थिक शिस्त आणि जनसहभाग या पाच गोष्टींच्या आधारावर सुरुवात झाली आहे, असे या राजकीय प्रस्तावात म्हटले आहे.
