भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं. अनेकजण मागील काही काळापासून मनसे आणि भाजपचे सूर बदलले असल्याचंही म्हणत आहेत. या तर्कवितर्कांनंतर आशिष शेलार यांना राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारणा केली असता त्यांनी या भेटीचा उद्देश सांगितला. तसेच भेटीत राज ठाकरे यांना पुस्तकही भेट दिल्याचं सांगितलं.

आशिष शेलार म्हणाले, “मी पेंग्विन प्रकाशनाचं ‘बूक ऑन मुव्ही’ हे छानसं पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिलं. त्यात जगभरातील १०० प्रसिद्ध चित्रपटांविषयी माहिती आहे. मी स्वतः हे पुस्तक पाहिलं होतं आणि आवडलं होतं. त्यामुळे या दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्याशी भेटायचं ठरलं तेव्हा मी हे पुस्तक भेट दिलं. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचीच होती. या भेटीत या पलिकडे काहीही नाही. “

हेही वाचा : “राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर प्रेम”, कृष्णकुंजवरील भेटीनंतर कांचनगिरींचं वक्तव्य, नेमकं काय घडलं?

आशिष शेलार यांनी ही भेट केवळ दिवाळी शुभेच्छांसाठी असल्याचं म्हटलं असलं तरी राजकीय नेत्यांच्या प्रत्येक भेटीत भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा होत असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे मागील काही काळापासून मनसेने आपला अजेंडा मराठी माणसापासून हिंदुत्वाकडे नेलाय. याचाच भाग म्हणून मनसेच्या पक्ष झेंड्यातही बदल करण्यात आला. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणातील भाषाही काहीशी बदललेली पाहायला मिळत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, याआधी साध्वी कांचनगिरी यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरेंची विचारसरणी हिंदु राष्ट्राची असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना राज ठाकरेंना पाठिंबा द्यावं असं आवाहनही केलं होतं.

कांचनगिरी म्हणाल्या होत्या, “राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात.”

“राज ठाकरेंचा डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार”

“राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार करत आहेत. जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते अयोद्धेशी जोडलेले आहेत. आम्ही त्याचं भव्य स्वागत करू. पूर्ण संत समाज त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे,” असं मत कांचनगिरी यांनी व्यक्त केलं होतं.

“हिंदू राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा आहे. आमची राज ठाकरे यांच्याशी विचारधारा जुळते आहे. हिंदू राष्ट्र धोक्यात आहेत. त्यामुळे हिंदूत्व विचारधारा असणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे,” असं आवाहनही कांचनगिरींनी केलं होतं.