मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (Tiss) या संस्थेत गुजरात दंगलीवर आधारीत असलेली BBC Documentary चे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यावरुन आता दिल्ली आणि कोलकाता नंतर मुंबईतही राजकारण तापले आहे. भाजपाचे नेते यांनी Tiss संस्थेला इशारा दिला असून बीबीसीच्या माहितीपटावरुन भाजपाला सल्ला देणाऱ्या शरद पवार आणि मनसे पक्षावरी जोरदार टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलत असताना भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले की, मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये. तसेच शरद पवारांनी आम्हाला सल्ला देत असताना केतकी चितळे प्रकरणात ही भूमिका का नाही घेतली? असा प्रश्न विचारला आहे.

हे ही वाचा >> रशियन मुलाला झेडपीच्या शाळेची भुरळ, सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद शाळेत गिरवतोय मराठीचे धडे

तेव्हा खळ्ळखट्याकची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये

मनसेने देखील बीबीसीच्या माहितीपटावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “लोकशाहीमध्ये कुणाचाही हक्क हिरावून घेता येत नाही.” यावर उत्तर देताना शेलार म्हणाले, आम्ही कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत. जे मनसेचे लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. त्यांनी मनसेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना शिवाजी पार्कवर आणून खळ्ळखट्याक करा असे सांगितले होते. तेव्हा हे सांगताना त्यांना लोकशाही आठवली नाही का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.

Tissच्या आडून राजकारण करणाऱ्यांनी समोरासमोर यावे

आशिष शेलार म्हणाले, “BBC Documentary ने अपप्रचार, दुष्प्रचार आणि असत्य पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेत बीबीसीचा माहितीपट दाखविण्याचे काम विशिष्ट धर्माच्या संघटननेने केले असल्याची आमची माहिती आहे. हा विषय मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे कारण बनू शकतो, अशी भावना कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे. म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केले आहे, यावर वेळीच कारवाई करा. मोदींच्या बदनामीचा प्रयत्न मुद्दामहून केला जात आहे. भावना भडकविण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत.” तसेच Tiss ने असे धंदे बंद करावेत. Tissच्या आडून जर काही संघटनना हे काम करत असतील तर त्यांनी राजकारणात समोरासमोर येऊन सामना करावा, असे आव्हान देखील शेलार यांनी दिले आहे.

आदित्य ठाकरेंचे वराती मागू घोडे

मुंबईत वायू प्रदूषण होत असल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. त्यावर बोलत असताना शेलार म्हणाले, आदित्य ठाकरे हे उशिरा जागे झाले आहेत. चार दिवसांपूर्वी मी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. मी पत्र लिहून मागणी केल्यामुळे आता त्यांना प्रश्न विचारले जातील म्हणून त्यांनी ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. भाजपाने हा विषय स्वतः लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहिले आहे. आदित्य ठाकरे वराती मागून घोडे घेऊन आले आहेत. तुम्ही दिलेल्या बांधकामाच्या परवानग्यामुळे डस्ट निर्माण झाली, असा आरोपही शेलार यांनी केला.