अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील घोटाळे ‘सिटिझन फोरम’ने उघडकीस आणली असून अनेकदा पत्रव्यवहार करूनही अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच त्यांच्या प्राचार्यावर कारवाई केली जात नाही, अशा शब्दात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तावडे यांना या सर्वाची जबाबदारी घ्यावी लागेल असे स्पष्ट करत, आठवडय़ात संबंधित प्राचार्य व महाविद्यालयांवर कारवाई न केल्यास मी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेन, असा इशारा केळकर यांनी दिला.
‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’, तंत्रशिक्षण संचालनालय तसेच मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या संगनमतानेच अनेक वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालये व शिक्षण सम्राटांमुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.