भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण राज ठाकरे २३ जानेवारी रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार आहेत असं समजतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे पाहिलं जातं आहे. या दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली अशीही माहिती समजते आहे.

याआधीही राज ठाकरे आणि शेलार आले होते समोरासमोर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या विरोधात प्रचार केला होता. तसंच विधानसभा निवडणुकीच्यावेळीही भाजपाच्या विरोधातच भूमिका घेतली होती. या दरम्यान मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंची या प्रदर्शनाला हजेरी होती. याच कार्यक्रमाला आशिष शेलारही आले होते. मात्र त्यांना जेव्हा समजलं की त्या कार्यक्रमाला राज ठाकरे आले आहेत त्यावेळी शेलार यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर या दोघांमधली मैत्री तुटल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

दीड तास रंगली चर्चा

आता मात्र आज राज ठाकरे यांच्या भेटीला आशिष शेलार गेले होते त्यामुळे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.