मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजपा नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा देत भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली आहे. त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत. टिव्ही९ मराठीसोबत बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

“तुम्ही दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल, बोबडेपणाबद्दल भाष्य करता. मग तुझ्या मुलाच्या आवाजाबद्दल कोणी म्याव म्याव आवाज काढला किंवा त्याच्याबद्दल काही म्हटले तर तुम्हाला वाईट का वाटतं? दुसऱ्यांची टिंगलटवाळी करताना स्वतःबद्दल पण ऐकण्याची थोडी हिंमत ठेवली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तर ती पडली असती असे म्हणालात. तर उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते असं आम्ही म्हणायचे का?” असे नितेश राणे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शनिवारी सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता. मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपाने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती. आता भाजपावाले म्हणतात की, जो पडला होता, तो केवळ बाबरीचा ढाचा होता. मग त्यावेळी भाजपाने आम्ही मशीद पाडून मंदिर बांधले, असा गवगवा का गेला,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.