राम कदम यांची बिनशर्त माफी, महिला आयोगाला पाठवला खुलासा

भाजपा आमदार राम कदम यांनी आपल्या वक्तव्यासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागितली आहे. राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवला.

घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात मुलगी पळवून आणण्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांनी आपल्या वक्तव्यासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागितली आहे. राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवताना माफी मागतिली आहे. भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा त्यांनी शब्द दिला आहे.

राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती. राज्याच्या वेगवेगळया भागात त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. राम कदम यांनी पाठवलेल्या या माफी नाम्यावर कायदेशीर सल्ला घेऊ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. राज्य महिला आयोगाने कदम यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना पाच सप्टेंबर रोजी नोटीस बजावून आठ दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

काय म्हणाले होते राम कदम
घाटकोपर येथे राम कदम यांनी दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित गोविंदांसमोर बोलताना त्यांनी ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वक्तव्य केले होते.

गोविंदाला आठव्या थरावरुन उतरवलं होतं
अभिनेत्री प्राची देसाईच्या एका डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना दमबाजी करुन आठव्या थरावरुन खाली उतरवले होते. दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी राम कदम यांनी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित केलं होतं.

अभिनेत्री प्राची देसाईने सुद्धा कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी समोर असलेल्या उपस्थित गर्दीला उद्देशून ती ‘बोलबच्चन’ सिनेमातला एक डायलॉग बोलत होती. प्राचीने डायलॉग बोलायला सुरुवात केली इतक्यात एक गोविंदा पथक मानवी मनोरे रचून हंडीच्या जवळ पोहोचले. सर्वात वरच्या आठव्या थरावरचा गोविंदा हंडी फोडणार इतक्यात राम कदम यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

राम कदम यांनी दमबाजीच्या स्वरात त्या गोविंदाना खाली उतरण्यास सांगितले. मी तुम्हाला योग्यवेळी सूचना देईन तेव्हाच हंडी फोडा असे कदम या गोविंदांना अधिकारवाणीच्या स्वरात म्हणाले. बिचारे गोविंदाही निमूटपणे खाली उतरले. खरंतर कदम त्यावेळी प्राची देसाईचा डायलॉग थांबवू शकत होते. तेच व्यवहार्य सुद्धा होतं. पण मुंबईतल्या भाजपाच्या या डॅशिंग, दयावान आमदाराने धाडस, हिम्मत दाखवून आठ थर रचणाऱ्या गोविंदांना खाली उतरवलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp mla ram kadam aplogise for his recent statement about girls

ताज्या बातम्या