मुंबई : हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर भाजप-मनसे युती होवू शकते, अशी शक्यता भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी बुधवारी व्यक्त केली. दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्दय़ांवर मतभेद आहेत, मात्र राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी झाल्यावर भाजप-मनसे युतीच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी झाल्या होत्या. हिंदूत्वाचा समान धागा असला तरी परप्रांतियांच्या विरोधाची भूमिका मनसेने सोडली नाही, तर या युतीची शक्यता नाही, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले होते. मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडले असून भाजपवर फारशी टीका केलेली नाही. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी युतीची शक्यता वर्तविली असली तरी याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट केले.
हिंदूत्व हा भाजपचा श्वास -चंद्रकांत पाटील
मनसे अध्यक्ष हिंदूत्वाबाबत जे आज बोलत आहेत, ते मुद्दे भाजप आधीपासूनच मांडत आहे. हिंदूत्व हा भाजपचा श्वास असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले. हिंदूत्व म्हणजे मुस्लिमांवर आक्रमण नाही, पण त्यांचे लांगूलचालनही नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. मुस्लीम बांधवांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी, पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी.
कोणी मशिदीत जाण्यास अथवा नमाज पढण्याला आमचा विरोध नाही. एखाद्याच्या धर्माचा आदर करताना दुसऱ्याच्या धर्माचाही आदर केला पाहिजे. इतरांवर आपला धर्म थोपविण्याची आवश्यकता नाही, असे पाटील यांनी सांगितले. भाजप कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतात आणि संघ हिंदूत्वाबाबतचे मुद्दे गेली वर्षांनुवर्षे मांडत आहे. अयोध्येत राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा, हे मुद्दे भाजप सुरुवातीपासून मांडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदूत्वाबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे नसून सामान्य माणसाचे मत महत्त्वाचे आहे. या देशातील हिंदूत्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने केलेल्या कार्याची सर्वसामान्यांना जाणीव आहे, असे पाटील यांनी नमूद केले.