scorecardresearch

“तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला!

‘तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली…!’

“तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला!
संग्रहित

गेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं, तो मेळावा आज संध्याकाळी मुंबईच्या दोन महत्त्वाच्या मैदानांवर होणार आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल होणार हे निश्चितच आहे.मात्र, त्याआधीही एकमेकांना खोचक टोले, सल्ले देणं सुरू आहे. भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणावरून खोचक सल्ला देण्यात आला आहे. तसेच, या भाषणासाठी काही मुद्देसुद्धा भाजपाकडून सुचवण्यात आले आहेत.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीट्समधून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. “उद्धव ठाकरे, आज शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का?” असा खोचक प्रश्न केशव उपाध्येंनी ट्वीटमध्ये केला आहे. त्यापुढे आणखीन चार ट्वीट्स त्यांनी केले आहेत.

‘आज कोणती नवी गोष्ट सांगणार?’

लाकुडतोड्याच्या गोष्टीवरून उद्धव ठाकरेंना खोचक प्रश्न या ट्वीटमध्ये केला आहे. ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना तुम्ही घरात बसून केलेल्या भाषणात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली होती. आज कोणती नवी गोष्ट सांगणार?’ असं उपाध्ये म्हणाले आहेत. तसेच, ‘लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का? कारण तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का?’ असाही प्रश्न या ट्वीट्समधून विचारण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकनान कोण भरून देणार?’

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही केशव उपाध्येंनी टीकास्र सोडलं आहे. ‘तुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांत – फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का?’ असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का?’ असाही सवाल ट्वीट्समध्ये करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या