महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रविवारी पुन्हा पत्रकारांसमोर हजेरी लावली आणि क्रूझ ड्रग्जशी संबंधित अनेक मोठे दावे केले. नवाब मलिक यांनी मोहित कम्बोज यांनी आर्यन खानला खंडणीसाठी किडनँप केलं असा आरोप केला आहे. मोहित कम्बोजच्या मेहुण्याद्वारे सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला अडकवण्यात आले असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सहा तारखेच्या पत्रकार परिषदेत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. कॉर्डेलिया क्रूजवरील ड्रग्न प्रकरण बनावट असल्याचे आम्ही सांगितले होते. त्यावेळी एक व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये किरण गोसावी आणि मनिष भानुषाली दिसत होते. याआधीही ते एनसीबीच्या कार्यालयात जात असल्याचे व्हिडीओ समोर आणले होते. पत्रकार परिषदेनंतर ज्ञानेश्वर सिंह यांनी ते आमचे स्वतंत्र पंच आहेत असे म्हटले होते. जावयावरील कारवाई वरुन नवाब मलिक आरोप करत असल्याचे त्यावेळी म्हटले होते. तेव्हा मी जावयाला जामीन मिळाल्याचे सांगितले होते,” असे नवाब मलिक म्हणाले.

“समीर वानखेडेंनी १४ लोकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. आम्ही त्यांना तिघांची नावे विचारली असता त्यांनी सांगितली नाहीत. या तिघांना सोडण्यात सोडण्यामध्येच मोठा खेळ आहे. ज्यावेळी मी ऋषभ सचदेवाचे नाव समोर आणले तेव्हापासून मोहीत कम्बोज पूर्णपणे झटपटले आहेत. आर्यन खान प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या बोलवण्यानंतर क्रूझवर गेला होता. हे संपूर्ण प्रकरण अपहरण आणि खंडणीचे आहे. मोहित कम्बोजच्या मेहुण्याद्वारे सापळा रचण्यात आला. तिथे आर्यन खानला पोहोचवण्यात आले आणि २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरु झाला. १८ कोटींमध्ये डील झाली आणि ५० लाख रुपये घेण्यात आले. पण एका सेल्फीने सगळा खेळ बिघडवला हे सत्य आहे. आर्यन खानच्या अपहरणाचा मास्टरमाईंड हे मोहित कम्बोज आहेत. खंडणीच्या प्रकरणामध्ये कम्बोज हे समीर वानखेडेंचे साथीदार आहेत. मोहित कम्बोज आणि वानखेडेंचे चांगले संबंध आहेत. ते मुंबईत १२ हॉटेल चालवत असून शेजारी प्रतिस्पर्ध्यांवर दवाब आणण्यासाठी त्यांना बनावट प्रकरणांमध्ये अडकवतात,” असे नवाब मलिक यांनी म्हटले.

“समीर वानखेडेंनी आरोप केला की कब्रस्तानमध्ये जाताना कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. माझ्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कम्बोज आणि समीर वानखेडे ओशिवारा कब्रस्तानच्या बाहेर भेटले होते. तिथल्या रहिवाश्यांनी मला माहिती दिली की एक गाडी आली होती आणि एक दाढीवाली व्यक्ती त्यांना भेटली होती. त्यांचे नशीब चांगले आहे की सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज आम्हाला मिळाले नाही. वानखेडेंनी घाबरून तक्रार नोंद केली. या शहरामध्ये ड्रग्जचा व्यवसाय सुरु राहावा हा समीर वानखेडेंचा प्रयत्न आहे. ड्रग्ज माफियांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. ड्रग्ज घेणाऱ्या सिनेकलाकारांची माहिती घेऊन त्यांना घाबरवावे आणि त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम समीर वानखेडे करत आहेत,” असे आरोप मलिक यांनी केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mohit kamboj mastermind of aryan khan abduction shocking revelation of nawab malik abn
First published on: 07-11-2021 at 10:51 IST