भाजपचा मंत्रालयावर मोर्चा; आघाडी सरकार फसवणूक करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भाजपने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भाजपने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या नाकर्त्यां सरकारमुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे ते या विषयाचा अभ्यास करत नाहीत आणि मार्गही काढत नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी भाजपच्या स्तरावर २७ टक्के उमेदवारी ओबीसींना देऊन हे आरक्षण पक्षपातळीवर लागू करू. महाविकास आघाडी सरकारची दानत नसेल तर किमान २७ टक्के जागांवर शिवसेनेने ओबीसी कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा सल्लाही पाटील यांनी शिवसेनेला दिला.  

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण टिकवले आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी बांधवांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेशात मंत्र्यांची समिती पाठवून शिवराजसिंह चौहान यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार अतुल सावे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते, आमदार मनीषा चौधरी, या मोर्चात सहभागी झाले. भाजप प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली.

ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चा हे भाजपचे नाटक -पटोले

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार  असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली. आता ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचे भाजपचे हे निव्वळ नाटक आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्षे त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपच आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp morcha mantralaya chandrakant patil alleges alliance government is cheating ysh

Next Story
एमकेसीएल, टीसीएसमार्फत परीक्षा घेण्यास विरोध; ‘एमपीएससी’साठी विद्यार्थ्यांचा आग्रह
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी