मुंबईतील कमला मिल कंपाउंडमध्ये झालेल्या अग्नितांडवाला या महानगरीची अफाट लोकसंख्या कारणीभूत असल्याचं विधान भारतीय जनता पार्टीच्या खासदार हेमा मालिनी यांनी केलं आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर कमला मिलमधल्या ट्रेड हाऊस इमारतीतील वन अबव्ह या बारमध्ये आग लागली. आगीनं उग्र रूप धारण केलं आणि आजुबाजुचा मोठा परीसर भक्ष्यस्थानी पडला. वाढदिवसाची पार्टी साजरी करायला आलेल्यांपैकी १४ जण गुदमरून मरण पावले. शहरांची लोकसंख्या किती असावी यावर बंधन हवं आणि ती मर्यादा संपल्यावर लोकांना रहायला देऊ नये अशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वेळोवेळी मांडलेली भूमिका हेमा मालिनी यांनी मांडली आहे.

या दुर्घटनेची दखल शोक व्यक्त करत पंतप्रधानांसह संपूर्ण भारताने घेतली. हेमा मालिनी यांनी देखील या घटनेची दखल घेतली. मात्र, पत्रकारांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेला मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हेमा मालिनी यांनी पुढे जात पोलीस त्यांचं काम करत नाहीत असं नाहीये, ते खूप चांगलं काम करत आहेत असं खरंतर पोलिसांचा संबंध नसलेलं विधान केलं. त्यापुढे जात त्या म्हणाल्या की मुंबईची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की, जेव्हा मुंबई संपते तेव्हा दुसरं शहर सुरू होतं आणि शहर वाढतंच राहतं.

या आगीमध्ये १४ जण ठार झाले तर १९ जण जखमी झाले. लोअर परळमध्ये सेनापती बापट मार्गावर कमला मिल कंपाउंड असून ट्रेड हाऊसमध्ये तिसऱ्या मजल्यावर वन अबव्ह हा बार आहे. विशेष म्हणजे या कंपाउंडमध्ये तब्बल ४२च्या आसपास हॉटेल्स व पब्स असून ते गेल्या काही महिन्यांत फोफावले आहेत.

दादर, परळ आणि वरळी या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यालये व रहिवासी इमारती गेल्या काही वर्षांमध्ये वसल्या असून गर्दीही वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी एलफिन्स्टन पूलावर घडलेल्या दुर्घटनेत २२ मुंबईकरांना चेंगराचेंगरीमध्ये प्राण गमवावे लागले होते.
मुंबईतल्या गर्दीचा व वाढत्या लोकसंख्येच्या भाराचा मुद्दा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेकवेळा उचलला आहे. विशेष म्हणजे आता भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनीही लोकसंख्या वाढीला दुर्घटनेसाठी जबाबदार धरले आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या की, “प्रत्येक शहरामध्ये किती लोकसंख्या असावी यावर बंधन असायला हवं. ती मर्यादा संपल्यानंतर लोकांना त्या शहरात राहण्याची परवानगी देता कामा नये. त्यांनी दुसऱ्या शहरात जायला हवं.” हेमा मालिनी यांच्या या राज ठाकरे यांच्या भूमिकेशी साधर्म्य सांगणाऱ्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेकांनी सोशल मीडियावर टीकाही केली आहे.