मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी सभाशास्त्राचा अनुभव तोकडा पडत असल्यामुळे वारंवार सत्ताधाऱ्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागते आहे. सत्ताधाऱ्यांच्या या नामुष्कीची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून मुंबई महापालिकेतील कामकाजाची माहिती असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी उपदेशाचे डोस आणि कानपिचक्याही दिल्याचे समजते.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या आठवड्यात भाजपला नामुष्की पत्करावी लागली होती. संख्याबळाअभावी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. पक्षादेश काढलेला असतानाही नगरसेवक वेळेत न पोहोचल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली. विरोधकांनी एकजूट दाखवत तातडीच्या कामकाजाला संख्याबळाने विरोध केला. वडाळ्यातील एक भूखंड विकासकाला देण्याबाबतच्या प्रस्तावासह तातडीचे कामकाज म्हणून आणलेले प्रस्ताव सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवावे लागले. महासभेच्या पटलावरचा हा पराभव सत्ताधारी भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सभागृह नेते गणेश खणकर यांनी सर्व ८९ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
हे प्रकरण अजून ताजे असतानाच सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाने भाजपवर आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या महापौर पदाच्या खुर्चीवर बसायला निघाल्या होत्या. माजी महापौर आणि आताच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या महापौरांच्या आसनापर्यंत गेल्या आणि आसनावर बसणार इतक्यात भाजपचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले आणि भाजपची लाज जाता जाता वाचली. गेली पंचवीस वर्षे सत्तेचा अनुभव असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्ष सभाशास्त्राद्वारे भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून यावरून ज्येष्ठ नगरसेवकांना वरिष्ठ नेत्यांकडून कानपिचक्या दिल्या असल्याचे समजते. मंगळवारी मुंबई महानगरपालिकेतील कामकाजाचे ज्ञान असलेल्या मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी, आमदारांनी महापौरांसह आपल्या ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. यात काही कान पिचक्या दिल्याचेही समजते.
महापालिका सभागृहात अथवा समितीमध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल अथवा एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर कोणती काळजी घ्यावी, यासाठी मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह वरिष्ठ नगरसेवकांची मंगळवारी भाजपाच्या दादर येथील पक्ष कार्यालयात शाळा भरवली होती. यावेळी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजपा नेते प्रवीण दरेकर व अन्य जेष्ठ नेते तसेच सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ नगरसेवक तसेच समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सभागृहात उडणाऱ्या गोंधळाबद्दल नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेत सत्ता असताना पक्षावर नामुष्की ओढावून का घ्यायची, अशी विचारणाही यावेळी नेत्यांनी नगरसेवकांकडे केल्याचे समजते. अभ्यास करून एखादा निर्णय घेणे, योग्य ठरेल. घाई गडबडीत प्रशासकीय माहिती न घेता कोणत्याही निर्णय घेऊ नये, असा सल्लाही नेत्यांनी यावेळी दिला.
समन्वय ठेवा …
महापालिकेमध्ये भाजपा शिवसेनेची सत्ता असल्यामुळे दोन घटक पक्षांमध्ये समन्वय महत्त्वाचा असतो. भाजपामध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती व अन्य महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्ष, मित्रपक्ष शिवसेनेच्या गटनेत्यांशी समन्वय असायला हवा. सभागृहातील कामकाजाबाबत महापौर सभागृहनेता व स्थायी समिती अध्यक्ष एकत्र बसून रणनीती आखली पाहिजे, असा सल्लाही भाजप नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना दिला.
ठाकरे गटाला वेळीच रोखा
शिवसेना ठाकरे गट १९९७ पासून महापालिकेच्या सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक नगरसेवकांना प्रशासकीय कारभाराची माहिती आहे. त्यामुळे ते नेहमीच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळे त्यांना वेळीच रोखा, अन्यथा सत्ता असूनही नामुष्की ओढवण्याची वेळ येऊ शकते, याकडेही भाजप नेत्यांनी आपल्या नगरसेवकांचे लक्ष वेधले. दरम्यान, याबाबत सभागृहनेते गणेश खणकर यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांच्या व नगरसेवकांच्या, तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठका होत असतात. त्यात विविध विषयांवर चर्चा होत असते. त्याव्यतिरिक्त त्यात काहीही नव्हते, असेही ते म्हणाले.
