मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा बोलबाला समाज माध्यमांवरही व्हावा यासाठी मुंबई भाजपने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना थेट विकासकामांच्या ठिकाणी नेण्याची रणनीती आखली आहे. ‘विकसित भारत @२०४७’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आयोजित ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’च्या माध्यमातून भाजपने मुंबईच्या विकासाचे चित्र डिजिटल माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात सिद्धिविनायक मंदिर, अॅक्वा लाईन, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, एशियाटिक सोसायटी आणि कोस्टल रोड या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला. दौऱ्याच्या समारोपावेळी वरळी येथे साटम यांनी इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधत मुंबईच्या आगामी विकासाचा ‘रोडमॅप’ मांडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत असताना मुंबईचे योगदान अग्रणी राहील, असे साटम यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेखही त्यांनी केला. वाहतूक, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित प्रश्नांवर भविष्यातील नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईच्या राजकारणात विकासकामांचा मुद्दा सातत्याने केंद्रस्थानी ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व आहे. विशेषतः मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड आणि विमानतळ यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे सादरीकरण करून त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या बदलत्या पायाभूत रचनेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येतो. पारंपरिक राजकीय सभांपेक्षा सोशल मीडिया आणि प्रभावकांच्या माध्यमातून हा संदेश नव्या प्रेक्षकांपर्यंत नेण्यावर भर देण्यात आला.
‘मुंबई स्पिरिट’चाही राजकीय संदर्भ
मुंबईच्या ‘स्पिरिट’चा उल्लेख करताना साटम यांनी २६ जुलैच्या पुराच्या काळात मुंबईकरांनी एकमेकांना केलेल्या मदतीचा दाखला दिला. त्याचबरोबर वरळी आणि शिवडीतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा उल्लेख करून मुंबईकरांच्या ‘हक्काच्या घरा’च्या प्रश्नालाही विकासाच्या चर्चेशी जोडले.
दौऱ्याची सुरुवात सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाने झाली. त्यानंतर अॅक्वा लाईनने प्रवास, अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ परिसराची पाहणी करण्यात आली. एशियाटिक सोसायटीला भेट दिल्यानंतर कोस्टल रोडमार्गे वरळी प्रोमेनेड येथे दौऱ्याचा समारोप झाला. भाजप मुंबईचे सचिव तथा नगरसेवक प्रतिक कर्पे आणि मुंबई भाजप सोशल मीडिया संयोजक नचिकेत सहस्त्रबुध्दे यांच्या समन्वयाने हा दौरा आयोजित करण्यात आला. विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या इन्फ्लुएन्सर्सकडून त्याचा डिजिटल माध्यमांतून प्रसार करण्यावर भाजपचा भर राहणार आहे.
