मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, हे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश आहे, असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण पुन्हा लागू झाल्याचा प्रतिदावा भाजपने केला आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनस्थार्पित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुस्कारा सोडला. ओबीसी समाजाला महाविकास आघाडीमुळेच आरक्षण मिळाल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात माजी मंत्री व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरुवातीपासून प्रयत्न केले.  ओबीसी आरक्षणासाठीची ९९ टक्के लढाई महाविकास आघाडी सरकारने लढली होती. फक्त सर्वोच न्यायालयात माहिती सादर करण्याचे काम आताच्या सरकारने केले. त्याबद्दलही भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले. 

शिंदे-फडणवीस सरकारमुळेच आरक्षण -बावनकुळे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजावर अन्यायच झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ठाकरे सरकारने काहीच पुढाकार घेतला नव्हता. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येताच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले होते, असा आरोप भाजपचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनाी केला.

ओबीसींच्या हक्काचा विजय -अजित पवार

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवाल मान्य करून त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या अधिकाराचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या न्याय्यहक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

त्वरित निवडणूक घ्या -जयंत पाटील 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास मान्यता देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे. राज्य  निवडणूक आयोगाने आता कोणताही विचार न करता ताबडतोब निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजप, संघाचे मनसुबे उधळले -पटोले

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याचा निर्णय दिला आहे, त्याचे स्वागत करतानाच, या निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनसुबे उधळले गेले, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.