मुंबईत गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही दर्शक गॅलरी पर्जन्यजलवाहिनीवर उभारण्यात आली असून समुद्रात पिलरही टाकण्यात आले आहेत, यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झालं असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी यासंबंधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे.

“मुंबईला पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित केलेच पाहिजे ही आमचीदेखील भूमिका आहे. पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये. हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी एमआरटीपी कायद्याने आपल्यावर टाकली आहे,” असं नितेश राणे यांनी सांगितलं.

गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचं काम सुरू आहे. गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कवीवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे असं नितेश राणे यांनी सांगितलं.

“सदर पक्के बांधकाम कुठलेही सीआरझेड नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन ट्रॅब्युनलकडून (NGT) दंडपण आकारला जाईल,” असं नितेश राणे म्हणाले.

पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताला धरु जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरु आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. “मी आपणास विनंती करतो की एमआयरटीपी व सीआरझेड कायद्याप्रमाणे कारवाई करावी अन्यथा मला एमआयरटीपी कायद्यातील कलम 56 (A) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी न्यायलयात दाद मागावी लागेल,” असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला.