scorecardresearch

स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर भाजपचे धरणे

स्थायी समितीच्या बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली आहे.

बैठकीत बोलू न दिल्याचा भाजप सदस्यांचा आरोप

मुंबई : स्थायी समितीच्या बैठकीत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली आहे. शुक्रवारच्या बैठकीतही प्रस्तावांवर मत मांडू न दिल्यामुळे भाजप नगरसेवक संतप्त झाले आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून स्थायी समितीमधील भाजप सदस्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. शिवसेना व भाजपमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढत असून स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगत आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीतही त्याचाच प्रत्यय आला. स्थायी समितीतील प्रत्येक प्रस्तावावरून शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही तर शिवसेना भाजपचा विरोध झुगारून प्रस्ताव मंजूर करून बैठकीचे कामकाज पूर्ण करीत आहे. करोनामुळे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या बैठकांमध्ये सदस्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप भाजपकडून नेहमी होत असतो. भाजपने स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावही मांडला आहे. शुक्रवारच्या सभेत रस्ते व पदपथ सुशोभीकरणासंबंधी प्रस्ताव स्थायी समितीत आला असता त्यात अनियमितता असल्याने भाजप सदस्यांनी आक्षेप घेत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांना बोलू न देता, प्रस्ताव घाईघाईने मंजूर केला, असा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला आहे.

याआधीही विद्यार्थ्यांसाठी टॅब, मास्क खरेदी, जंबो करोना केंद्राचा खर्च, प्राणवायू प्रकल्प उभारणी, भंगार विक्री, आश्रय योजना, पेंग्विन देखभाल, नालेसफाई, वीर जिजामाता उद्यान विकास, बेस्ट डिजिटल तिकीट निविदा, मिठी, पोईसर नदी आदी विकासकामांच्या प्रस्तावावरही भाजप सदस्यांना बोलू दिले नाही, असा आरोप करीत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भाजप स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करत निदर्शने केली. स्थायी समिती अध्यक्षांच्या मर्जीप्रमाणे केवळ काही प्रस्तावांवरच चर्चा होते.हे लोकशाही मूल्यांची गळचेपी करणारे आहे अशी टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. स्थायी समितीतील मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात प्रसंगी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला. यावेळी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, राजेश्री शिरवाडकर, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, विद्यार्थी सिह, हरीश भांदिर्गे यांनी निदर्शने केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आरोप फेटाळले असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत झालेल्या बैठकांतील चर्चेत भाजपच्या सदस्यांनाच बोलण्याची संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बैठकीत भाजपच्या कोणत्या सदस्यांना बोलू दिले याबाबतचा चिटणीस विभागातील लेखी पुरावा सादर करून त्यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.  दरम्यान दुपारी तीन वाजता सुरू केलेले आंदोलन यशवंत जाधव दालनातून निघून गेल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत  सुरू होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp outside standing committee chairman office ysh

ताज्या बातम्या